Tuesday, November 1, 2022

माझी पहिली रोड ट्रिप - केरळ

        हल्लीच आम्ही दिवाळीच्या सुट्टीत केरळची रोडट्रिप केली. त्याबद्दलचे अनुभव लिहावेत असं मनात होत म्हणून हि प्रवास वर्णनाची मालिका काढतेय. आशा आहे तुम्हा सगळ्यांना हा नवीन प्रयोग आवडेल.
        आम्ही सध्या बंगळुरूला राहतो.  इथून कोची जवळपास ५६०किमीवर आहे. हि आमची पहिली रोडट्रीप असल्या कारणाने आम्हाला जास्त थकवायचं नव्हतं स्वतःला म्हणून दिवसाला फक्त २५० किमी पूर्ण करायचं असं ठरवलं. 

        केरळला निसर्गाची भरपूर देणं आहे म्हणजे डोंगर, कडे-कपार्या, धबधबे, तळी, जंगले, समुद्र किनारा आणि बरच काही. त्यामुळे आम्ही ह्या ट्रिप साठी खूप उत्साहित होतो. एक आठवडा आधीच आमची बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली. बाईक वरून रोडट्रीप असल्या कारणाने सेफ्टीबाबतची ची तयारी, हॉटेलचे बुकिंग, आणि कोणता रूट  घ्यायचा हे सगळं ठरवलं आणि आम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोर जावं लागलं ह्या सगळ्या बद्दल ह्या पोस्ट मध्ये मी लिहिणार आहे. ह्या सगळयाचा सारांश मी प्रश्न उत्तराच्या माध्यमाने मांडते. 

        

प्रश्न १:  कोणता route घ्यायचा ?

उत्तरं : खूप सगळे यूट्यूब व्हिडीओ आणि ब्लॉग्स वाचल्यावर आम्ही हा route घ्यायचा ठरवलं. 

प्रश्न २ : किती दिवसांची प्रवास होता ?

उत्तर : १० दिवस 


प्रश्न ३: हॉटेल बुकिंग कशी केली आणि कुठे थांबायचं ?

उत्तरं : आम्ही कोणकोणत्या जागा बघायच्या हे ठरवलं होत पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात प्रवासाला सुरुवात करू तेव्हा गोष्टी बदलु  शकत होत्या म्हणून आम्ही agoda हॉटेल बुकिंग वेबसाईटची निवड केली. ह्यात फायदा असा होतो कि तुम्ही २ किंवा ३ महिने आधीपासून बुकिंग करून ठेऊ शकता त्यासाठी पैसे नाही द्यावे लागत आणि २४ तास आधीपर्यंत कॅन्सल केलं तर मोफत बुकिंग कॅन्सल करू शकतो. हि आमची पहिली रोडट्रिप असल्या कारणाने आम्हाला माहित नव्हतं कि आम्ही पूर्ण करू शकू कि नाही म्हणून मग agoda चा पर्याय चांगला होता. 


प्रश्न ४: सामानाचे काय ?

उत्तरं : हा सगळ्यात मोठा प्रश्न होता कारण आम्ही जेवढे पर्याय ऑनलाइन पहिले त्यात जास्त करून लोकांनी एकटयाने प्रवास केलेला त्यामुळे ते लोक मागची सीट सामान बांधायला वापरतात. पण आमच्या बाबतीत तसं करता येणार नव्हत. शेवटी २ पर्याय निवडले कॅरीयर लावणं किंवा सॅडल स्टँड. आम्ही JC रोडला गेलो आणि सगळे पर्याय पहिले आणि कॅरीयर लावायचा निर्णय घेतला. जो पुढे जाऊन चुकला. खरंतर आम्हाला सॅडल बॅग्सचा पर्याय निवडायला हवा होता कारण ते कॅरीयर फार स्ट्रॉंग नव्हतं ज्यामुळे कोचीला पोहचल्यावर आम्हाला टॅंक बॅग पण विकत घ्यावी लागली जेणेकरून मागचं वजन कमी होईल. 


प्रश्न ५ : सेफ्टीबद्दल काय ?

उत्तरं : बाईक वरून प्रवास करणार असल्याने सुरक्षेचा विचार करायलाच लागणार होता. आंम्ही दोघांनी पण रायडिंग जॅकेट्स घेतले आणि knee guards सुद्धा. विक्रांतने नवीन हेल्मेट सुद्धा घेतला. कारण सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नव्हतं. 






Saturday, July 18, 2020

लॉकडाउन आणि सवयी

नमस्कार मित्रांनो,

           लॉकडाउन अजूनही सुरूच आहे. सुरुवातीला वेळ होता तसा आता मिळत नाही कारण सुरुवातीच्या काळात सगळेच गोंधळले होते आणि निर्णय कि पुढे काम कस सुरु ठेवायचं त्याबद्दल काही ठरलं नव्हतं त्यामुळे बराच वेळ मिळायचा. पण आत्ता तसं नाहीयेय मित्रांनो. आता मिटिंग्स वैगरे सगळं ऑनलाईन चालतं तर मग आता कामाचा लोड वाढलाय.
        ह्या लेखात मी ह्या लॉकडाउन मध्ये काय शिकले याबद्दल आहे. खूप सगळ्या वाईट सवयीना बदलण्याची हि चांगली संधी होती. मी ह्या संधीचा पूर्ण फायदा घेतला असं नाही म्हणणार कारण अजून बराच काही होऊ शकल असतं. असो तर लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात मी बरीच पुस्तकं वाचली. काही पुस्तकांची नाव मी इथे सांगतेय :
1.Anything you want - Derek Sivers
2.Time management - Sudhir dixit
3.Eat that frog - Brian Tracy
4.The Blue Umbrella - Ruskin Bond
5.Faster than Lightening:My autobiography - Usain Bolt
6.Miracles of your mind - Dr. Joseph Murphy
7.Harry Potter and Prisoner of Azkaban - J.K.Rowling
8.The monk who sold his ferrari - Robin Sharma
9.The Diary of a Young Girl - Anne Frank
10.Brida - Paulo Coelho
11.मुसाफिर - अच्युत गोडबोले
12.How to win friends and influence people - Dale Carnegie
13.The Little Prince - Antoine de saint-Exupery
14.Siddhartha - Hermann Hesse,Hilda Rosner
15.Fault in our stars - John Green

           हे झालं पुस्तकांबद्दल पण अजूनही बऱ्याच गोष्टी या लॉकडाउनमध्ये शिकता आल्या. मला खूप दिवसांपासून व्यायामाची सवय लावायची होती पण कधीच तसा वेळ मिळत नाही अशी मी तक्रार करायची त्या तक्रारीचा बहाणा संपला आणि शेवटी मी दररोज व्यायाम करायची सवय लावून घेतली. माझं वजन कमी झालं कि नाही माहित नाही पण मला खूप छान वाटतं.
         तर मी सकाळची सुरुवात अशी करते :
        १.कोमट पाण्यात काही तूप घालून ते पाणी पिणे . मला मुळव्याधी चा त्रास आहे आणि ह्या रोजच्या एका सवयीने खूप आराम पडला. तसंच माझे पाय खूप वळायचे त्यावरही खूपच रामबाण औषध मिळालं. माझ्या आईने हा नुस्का स्वागत तोडकर सरांच्या युट्यूब वरच्या एका विडिओमध्ये पाहिलेला. थोडक्यात काय तर हि एक नवीन सवय माझ्या फारच फायद्याची ठरली.
        २. त्यानंतर अर्धा तास योगा आणि नंतर १५ मिनिटं ध्यान लावून बसणं. ध्यान केल्याने तुम्हाला लक्ष केंद्रित करायला बरीच मदत होते. आणि मन अगदी शांत होत.
       ३.  पौष्टिक नाश्ता. व्यायामानंतर अगदी सपाटून भूक लागते. तसे मराठी सगळेच  पौष्टिक आहेत. अगदी ते इंग्लिश ओट्स वैगरे खायची गरज नाही.

ह्या सवयी मी लावून घेतल्या ह्या वेळात. पण एक गोष्ट मात्र खरी काम मात्र घरी राहून कारण खूपच कठीण आहे. आणि त्यामुळे बरीच लोकांना बरेच मानसिक त्रास होतायत. तुम्ही तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. आणि हा  लेखं आवडला असेल तर कृपया LIKE करा. तुमचा प्रतिसादाने मला प्रेरणा मिळते. तुमचे विचार नक्की सांगा कंमेंट्स मधून. मला ऐकायला नक्कीच आवडेल..

Saturday, June 20, 2020

मुसफ़िर - अच्युत गोडबोले


             हि अच्युत गोडबोले यांची आत्मकथा आहे. मुळचे सोलापुरचे, नंतर शिक्षणासाठी मुंबईला आले आणि मग मुंबईलाच स्थायिक झाले. नंतर नोकरी , परदेश प्रवास, वैयक्तिक आयुष्य , लिखाण अशा त्यांच्या या प्रवासाची हि कहाणी आहे.
            गोडबोलेंच बालपण अगदी समृद्ध गेलं. त्यांचे मित्रमंडळी, शिक्षक, शाळा , छंद , संगीत , सिनेमे या सगळ्याचे अनुभव अगदी रसभरीत आहेत . वाचताना अगदी मजा येते. १२वीला JEE परीक्षेत उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले आणि IIT Bombay ला Chemical Engineering ला प्रवेश घेतला. त्यानंतर रॅगींग , वाचन ,संगीत , इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड, कॉलेजमधील मजा-मस्ती हा सगळा रोमांचकारक प्रवास अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर उभा करतात. मला IIT चे अनुभव ऐकताना सगळ्यात जास्त मजा आली.
            त्यानंतर समाजसेवा करायची म्हणून त्यांनी कॅम्पस प्लेसमेंट मधून लागलेली नोकरी न स्विकारता गोडबोलेंनी स्वतःला आदिवासींच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले. तिथे जवळपास एक वर्ष काम केल. तेथील अनुभव, आदिवासींच्या व्यथा , त्यांच्यावर होणारे अन्याय , त्यांचा इतिहास , राजकीय घडामोडी याबद्दल बरीच नवीन माहिती मिळते. अशाच एका कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून पोलीस त्यांना आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करतात आणि त्यांना दहा दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा होते. या दहा दिवसांमध्ये त्यांना बऱ्याच प्रकारचे लोक भेटतात वेगवेगळ्या विचाऱ्यांच्या, वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या. कैद्यांचे आयुष्य, त्यांचे अनुभव याबद्दल बरच काही वाचायला मिळत.
             त्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्यांना अस जाणवायला लागत कि आपण हे काम आयुष्यभर नाही करू शकणार. हि जाणीव होताच ते मुंबईला येतात. याच काळात बेकार असताना ते वेगवेगळ्या चाळींतील लोकांना भेटतात त्यांच्याशी सवांद साधतात. या सगळ्या लोकांचा वेगवेगळ्या कथाहि या पुस्तकात वर्णिलेल्या आहेत. वेश्या, त्यांचे जीवन, त्यांच्या व्यथा , त्यांच्या कथा याबद्दल बरच काही. याच काळात ते प्रेमातहि पडतात 'शोभा' नावाच्या मुलीशी. तेव्हा ती जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिक्षण घेत असते. लेखकाला 'टाटा मिल' मध्ये नोकरी मिळते प्रोग्रामर म्हणून आणि अशाप्रकारे त्यांचं इन्फोटेक मधल करिअर सुरु होत. मग शोभा आणि गोडबोले रजिस्टर पद्धतीने लग्न करतात. आणि इन्फोटेक क्षेत्रातच ते ३७ वर्ष नोकरी करतात.
               इन्फोटेक मधेच काम करत असताना त्यांच्या आयुष्यात अजून एक मोठा प्रसंग घडतो आणि पूर्ण कुटुंब हादरून जात तो म्हणजे त्यांच्या मुलाला ऑटिसम असल्याचं त्यांना कळत. मग त्याच्या भविष्यासाठी जमवाजमव करणं, त्याच्यासाठी शाळा शोधण, विविध उपचार त्याला देणं, या  सर्व गोष्टीवर लेखक भाष्य करतात.
                आणि शेवटी त्यांच्या लेखनाच्या प्रवासाविषयी सांगतात. त्यांच्या किमयागार, नादवेध , अर्थात यासारख्या अनेक पुस्तकांविषयी ते भरभरून बोलतात आणि या पुस्तंकामुळे लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला याबद्दलही बोलतात.
              हि तर ओव्हरऑल एक ओउटलाइन आहे पण खरी मजा तर यासर्व टप्प्यातील त्यांचे अनुभव ऐकण्यामधे आहे. मी ह्या पुस्तकाला ५/५ रेटिंग देईल . प्रत्येक टप्प्याटप्प्याला गोष्ट अगदी रंगत च जाते. लेखनशैली भन्नाट आहे. अगदी खिळवून ठेवणार पुस्तक आहे. तुम्ही  हे पुस्तक नक्कीच वाचाल अशी आशा आहे . मला तुमची मत ऐकायला नक्कीच आवडेल. मला नक्की कळवा.

Sunday, March 15, 2020

बाबा भाग - १

                                                         बाबा
         किती गोड शब्द आहे ना!. पण तुम्हाला माहितेय का आज जेवढी या शब्दाची किंमत कळतेय ना तेवढी ती या आधी कळली नव्हती.  मित्रांनो याच कारण पण तसाच आहे. काही दिवसांपुर्वी मी माझ्या वडिलांना गमावलं. ८ फेब्रुवारी २०२० साली त्यांचं निधन झालं.  ते फेसबुकवर पोस्ट येतात ना कि प्रत्येक यशस्वी मुलीचा मागे एक खूप विश्वास टाकणारा बाप असतो माझे पप्पा अगदी तसेच होते. मी आज IIT मध्ये M.Tech करतेय. ते नेहमी म्हणायचे कि मला फक्त तुझाकडून अपेक्षा आहे. माझं नाव तुच मोठं करशील असं मला वाटतं. आणि त्यांचा डोळ्यात तो आनंद दिसावा म्हणून मी पण खुप मेहनत घेतली.
          मी दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली आली तेव्हा त्यांना झालेला आनंद. मला IIT ला दाखला मिळाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा तो आनंद, त्यांना माझाबद्दलचा असलेला अभिमान त्यांचा प्रत्येक कृतीतून दिसत होता. काही दिवसांपूर्वी ते मला सोडायला आले होते IIT ला , खुप खुश होते. मला आज खूप बरं वाटतं कि जायच्या आधी मी त्यांची हि इच्छा पूर्ण करू शकली. आता माझं पुढचं यश ते पाहत असतील नसतील माहित नाही. पण जिवंतपणी मी त्यांना हा आनंद देऊ शकले ह्याच समाधान आहे.
          पण एक खंत पण आहे हे सगळं मिळवत असताना मला लवकर घरापासून लांब राहायला लागलं. मी अकरावी पासूनच हॉस्टेलवर राहते. त्यामुळे ह्या सगळ्यात त्यांचा सहवास कमी मिळाला. आता ते निवृत्त झाले होते घरी गेली कि आवडीने माशाची आमटी न भाजलेले मासे करायचे माझ्यासाठी म्हणून. न मग आम्ही दोघंच मिळून पूर्ण ताव मारायचो. तुमचा सहवासाचा लोभ होता पण नियतीचा डाव काही वेगळा होता असच म्हणायला हवं आता. सगळं खूप आठवेल पण तुमचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे.
           मला माफी मागायची आहे पप्पा तुमची कि तुम्ही रोज ओरडून पण मी तुम्हाला रोज कॉल नाही करू शकले. हि गोष्ट कायम खात राहील मला. आज मला तुमचा आवाज ऐकावासा वाटतो पण आता तो कधीच नाही ऐकता येणार. मला नेहमी तुमच्या सारखं बनायचं होत. तुमच्या आनंदातच मला सुख वाटायचं.
          मला माहित नाही हा मेसेज मी किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल पण जे लोक वाचतील त्यांना मला सांगायच आहे कि प्लीज जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या त्यांना खुश ठेवा. गमावल्या नंतर दुःख करून घेण्यात काहीच अर्थ नसतो आणि त्यांना आपल्याकडून अजून काहीच नको असत फक्त एक ५ मिनटं त्यांच्याशी प्रेमाने बोललं कि ते खुश होतात. प्लीज त्यांना वेळ द्या.
           आज खूप दिवसांनी मनातलं सगळं बोलून खूप बरं वाटलं तुम्ही ते वाचलंत न समजून घ्याल हि आशा.

Monday, February 19, 2018

मालवण रॉक गार्डन







tarkarli


अनुभवाची गोष्ट

नमस्कार मित्रहो,

              खूप दिवसांनी आज तुम्हा सर्वांशी बोलतेय. पण आज तुम्हा सर्वांना एक अनुभव सांगावा असं वाटलं.
काही दिवसांपूर्वी मी गुजरातचा प्रवास केला. या प्रवासमध्ये एक छोटासा प्रसंग घडला आणि अगदी मनाला स्पर्श करून गेला. तर घडलं असं,
               मी भुज एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करत होते. माझ्या बाजुला एक मध्यम वयीन काका बसले होते. प्रवासात वेळ जावा म्हणून त्यांनी खाण्यासाठी म्हणून चुरमुरे घेतले. हातातून पॅकेट सटकले आणि काही दाणे जमिनीवर पडले. खार तर तुम्ही किंवा मी असतो त्या जागी तर काय केलं असतं ? ते तसाच टाकून उरलेले दाणे पोटात गेले असते. काय बरोबर ना ? पण तुम्हांला सांगते त्या सदगृहस्थाने सगळे दाणे उचलले आणि कागदात गुंडाळून बागेत ठेवले.
               तसं पाहिल तर हि अगदिच क्षुल्लक गोष्ट आहे.  अन पाहिलं तर फारचं मोठी गोष्ट आहे. आपण कधीच या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत नाही. पंतप्रधानानी स्वच्छता मोहीम राबवली खरी अन खूप मोठ्या पातळीवर नेली. वाटलं सुद्धा कि आता भारत सुधारेल पण तसं झालं नाही. अन हा सुधार अचानक होणार हि नाही जोपर्यंत आपण आपल्या ह्या अश्या छोट्या सवयी बदलत नाही. आपल घर स्वच्छ राहावं म्हणून आपण किती प्रयत्न करतो पण आपला परिसर ,आपला देश स्वच्छ रहावा हि आपली जबाबदारी नाही का ? अन आपण त्यासाठी तेवढीच मेहनत घ्यायला नको का ?
                आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी महाराजांना अपेक्षित असं स्वराज्य घडवुया. प्रत्येकानं जर त्यांचा खारीचा वाटा उचलला तर नक्कीच स्वराज्य घडेल. अगदीच महाराजांचा स्वराज्य आणि हाच असेल शिवजयंतीचा  उत्सव. तुम्हा सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


Saturday, July 30, 2016


तू आणि मी 

अगं तुझ्या मेसेजची वाट बघून खुप दमलो,
पण तुझा विचारात फार रमलो........ ।।१।।

रात्र संपेना, विचार संपेनात,
अन डोळे पण मिटेनात ................ ।।२।।

वाटतंय खुप चुकलो मी 
म्हणूनच खुप घाबरलोय मी................।।३।।

वाटतंय कि तू सोडशील आता माझा हात 
पण अगं मला हवी फक्त तुझी साथ................  ।।४।।

तू म्हणतेयस मी नाही राहिलो तसा ,
तू बोलतोस ओरडतोस रागावतोस ................।।५।।

पण हे सगळं खरं असलं तरी,
तूच आहेस फक्त माझा स्वप्नातली खरी  परी..................।।६।।


         

Saturday, July 2, 2016

प्रेयसी 


तुझ्यासारखी असावी Lover ,
किती करतेस तू मला Cover ।।१।।

पाहताक्षणी bells उडाल्या
झालो clean bold ,
एका नजरेत धडधड वाढली 
झाला हा दिल sold ।।२।।

आलीस जवळ भिडली नजर 
केलास handshake,
जपून तो हात दिवसभर 
मन का करतय retake ।।३।।

झाला गोंधळ सा-यांचा 
बसलीस जेव्हा side ला,
राग वाढला त्या रोमिओंचा 
आले माझ्यासवे fight ला ।।४।।

धरली कॉलर फुटला घाम 
वाटले game झाला,
तुझ्या बसण्याचं दाम 
भलताच तुटून पडला ।।५।।

तरीही catch करतोय तुझ्या अदा 
कधी infront तर कधी backside 
कितीही patch तरी हा heart फिदा 
तूच दिसते त्याला inside आणि outside ।।६।।

सगळं year केला कहर 
माझ्या या feeling चा 
writting करू किती letter 
Eyes path तो पोचवायचा ।।७।।

read करशील कधी ना कधी 
Believe आहे या lover चा 
fall in love आहे तुझ्यामध्ये 
relief आहे या daily life चा ।।८।।

केली daring आणि rocking prupose 
with rose अन gift 
झाले pairing अन feeling angle reposed 
with close अन lift ।।९।।


माझी परी 

      सकाळीच उठल्यावर खिडकीतून पाहिल्या पावसाच्या सरी 
स्वप्नात आली होती माझी सुंदर परी 

स्वप्नातल्या जगात ती असते माझा कुशीत 
जस लहान मूल असत तिच्या आईच्या मिठीत 

हातात हात होता, डोळ्यात डोळे 
वाटत होतं की जन्मभराचा साथ होता 

आता  असेलही माझं स्वप्न फक्त स्वप्न 
नसेलही ती माझा जवळ, माझा मिठीत 

पण माझा विश्वास आहे 
एक दिवस असेल ती माझाच कुशीत,
फक्त माझा मिठीत ......... 






नवी दिशा 


चालत आहे नव्या दिशेला 
नव्या जगाच्या वाटेला 
वाटसरू मी नव्या दमाचा 
उत्तुंग भरारी ध्येयाचा ।।१।।
सोबतीस जरी भले मिळाले 
आम्हा आशा न सोबतीची 
स्वप्न उरी जे आम्ही थाटले 
त्याला जोड दिली ती कष्टाची ।।२।।

संकटातही भले भले थकले 
आम्हा सवय ती लढण्याची 
शब्द आमुचे ते खड्ग बनले 
त्यांना धार ती सूर्य किरणांची ।।३।।

समीप आले ध्येय आमुचे 
परी पाय न चालण्या थकले 
लक्ष्य आमुचे अवघड जरी 
तरी अंतर जिद्दीने कापले ।।४।।

झाला हर्षित प्रवास अमुचा 
आठवणींचा तो स्मरणाचा 
असा अमर मी वाटसरू तो 
घाव सोसतो ह्या काळचा ।।५।।

Sunday, June 26, 2016

समाधान 

कितीही मिळवले , कितीही गमावले तरी हे काही भेटत नाही 
कितीही दिले , कितीही घेतले तरी हे काही मिळत नाही ।।१।।

कोणालातरी मारतो ,कोणालातरी जगवतो फक्त हे मिळवण्यासाठी 
कोणाला दुखावतो , कोणाला सुखावतो फक्त हे अनुभवण्यासाठी ।।२।।

हे प्राप्त करण्यासाठी काय करावे सुचत नाही 
काहीतरी सुचलंच तर ते काही पुरत नाही ।।३।।

हे मिळवता मिळवता आपण सर्व काही खर्च करतो 
हेच मिळवण्यासाठी आपण गुगलवरही सर्च करतो ।।४।।

 जे समाधान मिळवण्यासाठी आपण सर्व काही करतो 
ते मिळवण्याच्या प्रयत्नात आपण समाधानच हरवून बसतो ।।५।।

Saturday, January 16, 2016

माझा पहिला विमानप्रवास

लहान असताना आम्ही विमानाचा आवाज आला की धावत अंगणात यायचो आणि आकाशातून जाणाऱ्या त्या विमानाकडे बघून हात दाखवायचो आणि उड्या मारायचो. काय कुतुहल वाटायचे तेव्हा विमान बघून, आजही वाटतेच. अन् वाटायचं मी कधी प्रवास करणार विमानातून? पण हि माझी इच्छा एवढ्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं.
           खर तर आम्ही आमच्या कोकणातल्या गावी आलो होतो, डिसेंबर महिनातल्या देवीच्या जत्रौत्सवासाठी. त्या निमित्ताने सगळ्या नातेवाईकांची भेट होते आणि 4 दिवस निसर्गरम्य वातावरणात रहायला मिळणार हा आनंद वेगळाच. येताना तर आम्ही कोकणरेल्वेने आलो. पण परतीची टिकिट काढली नव्हती. तेव्हा काकांच्या मनात आलं आणि त्यानी आम्हा दोघांची विमानाची टिकिट काढली. पहिल्यांदा विमानप्रवास अनुभवायला मिळणार या कल्पनेने मी उडालेच. खर तर अजून दोन दिवस होते निघायला पण तिथे काय असणार, कस असणार या विचारत ते दोन दिवस कसे गेले कळलंच नाहि.
          शेवटी तो दिवस उजाडला 12 डिसेंबर 2015. संध्याकाळी आमचं 5:50 चं विमान होत. आम्ही दुपारी 11 च्या सुमारास गोव्याला जायला निघालो. कारण दुपारी आत्याकडे जेवायचा बेत होता. त्या आत्याचं घर वास्कोला आहे. त्यामुळे गोवन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेता आला. जेवून 4:40 ला एअरपोर्टवर जायला निघालो. मी तर आता एक तासाने विमानात बसणार म्हणून हवेतच होते. वास्कोच्या एअरपोर्टवर पोहोचलो. तिथलं वातावरण अगदी वेगळ आणि माझ्यासाठी एकदम नवीन होत. गोआ पर्यटनसाठी प्रसिद्ध असल्याने तिथे विदेशी पर्यटकांची वर्दळ जास्त होती. सुरक्षाव्यवस्था अगदी जोखणण्यासारखी. हवाई सुंदरी म्हणजेच एअरहोस्टेस सगळीकडे वावरताना दिसत होत्या. जसजसा वेळ पुढे जात होता तसतसं मला अधिकच बैचेन वाटत होत. शेवटी आमच्या विमानाची सूचना झाली. विमानात प्रवेश करताच एअरहोस्टेसने हसून आमचं स्वागत केल. आणि नशीबाने मला विंडो सीट मिळाली. काहीच वेळात विमान रन वे वर होत. हळूहळू विमानाच वेग वाढला आणि विमानाने हवेत झेप घेतली. आणि असं वाटत होत की आम्ही हवेत तरंगतोय. गोव्याचा समुद्रकिनारा अगदी रम्य दिसत होता. घनदाट वनराई, मधुनच जाणारी एखादी अतिशय सुंदर द्रुश्य होत ते.
          संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला आलेला. आकाशात तांबुस रंगाच्या सोनेरी छटा पसरल्या होत्या. सूर्यदेव आकाशात विविध रंगाची उधळण करत आमचा निरोप घेत होते. आम्ही तो क्षण कॅमेराच्या मदतीने टिपयचा प्रयत्न केला. पण कॅमेरात ते दृश्य स्पष्ट दिसत नव्हतं. शेवटी डोळ्यांचा कॅमेरा करून ते दृश्य मी ह्रुदयाच्या मेमरी कार्ड मध्ये सुरक्षितरित्या जपून ठेवल.आता ढग दिसू लागले होते आणि ते खुप जवळच असल्यासारखे वाटत होते. प्रत्येकास लागणारी मदत करण्यास एअरहोस्टेस अगदी तत्पर होत्या. काळोख पडायला सुरुवात झाली होती. आता जमिनीवरचं काहीच दिसत नव्हत. पण मी मनोमन खुश होत होते कारण अशाच अंधारात मुंबई झगमगुन उठते, नाहि का ? मुंबई चं ते दृश्य बघायला मी आतुर होते. आणि त्यानंतर काही वेळातचं मुंबईने तीच दर्शन दिल. अगदी डोळ्यांचे पारणे फेडणार ते दृश्य होत. असंख्य दिवे आणि असंख्य दिव्यांचा तो झगमगाट, अवर्णनीय........!!!!! मुंबई म्हणजे मला आकाशगंगा वाटत होती. आणि त्यात दिसणारे ते असंख्य दिवे म्हणजे आकाशगंगेतले ते असंख्य तारे, असा भास होत होता. रस्त्यावरचे दिवे स्वतःची वेगळी ओळख दाखवत होते. पिवळसर तांबूस प्रकाशात न्हावून निघत होते. असे सगळे रस्ते एकमेकांना जोडलेले दिसत होते. आणि मुंबईचा नकाशा दाखवत होते. रस्त्यावरून जाणा-या गाड्या मुंगीएवढ्या दिसत होत्या. आणि अश्या मुंग्यांची लाईनचं लागली होती. ते दृश्य इतके विलोभनीय होते की न रहावून मी ते दृश्य कँमेरात टिपायचा प्रयत्न केला. पण त्या फोटोने काही माझे मन भरेना. आणि डोळ्यांत काय आणि किती साठवणार असा प्रश्न पडला. पण जमलं तेवढं सगळं नजरेत भरून घेतलं. आणि सान्ताक्रुझ विमान तळावर आमचं विमान उतरलं.
या अविस्मरणीय प्रवासाच्या सगळ्या आठवणी मी मनात साठवून ठेवल्या. आणि विमानातून उतरलो. माझा अनुभव तुमच्याशी शेअर करताना खुप मस्त वाटतयं.  तुमच्यापैकीही कित्येक जणांची विमानप्रवासाची इच्छा असेलच. पण खरच प्रत्येकाने अनुभवावा असाच तो प्रवास असतो. आयुष्यातील काही वेळ आणि पैसा मुद्दाम बाजुला ठेऊन एकदातरी विमानप्रवास नक्की अनुभवा. तुमच्या भावी विमानप्रवासासाठी माझ्या खुप खुप शुभेच्छा.आणि माझे काका विजय रेडकर यांना माझ्याकडून खुप खुप thank you. मला एवढे सुंदर क्षण अनुभवायची संधी दिल्याबद्दल.

Sunday, December 13, 2015

विरह

एक वेगळीच चुणूक
मनाला घोर लावते.
तुझ्याच विरहाची जाणीव
मनाला टोचत राहते.
काट्याची गुलाबाला
कशी काय साथ लाभावी.
तशीच या जीवाला
तुझीच साज़ का चढावी.
तुझे रोज स्वप्नात येणे
आणि जागे करून जाणे,
तु माझ्या नशीबी आहे की नाहि
देवच सारं जाणे.
पाहतो सार दिवसा ढवळ्या
सार खरच आहे ना हो.
तुम्ही द्यावी साथ
अन् मी तिचाच सदोदित राहो.

एक दिशा जीवनाची

एक दिशा जीवनाची,
ओढ नव्या जगाची,
एक दशा व्यथांची,
हे अपयश कालोखाचि.


स्वप्नं नाही खोटी,
जी पाहतो झोपेत.
हरतो सारी हिम्मत
आम्ही एका ठेचेत.


उठतानाहि हातांची
आशा का करावी.
उजवाडणा-या नभात
ध्येये उंच उडवी.


जगताना कठीण तेच का
वाट्याला आमच्या.
शक्ती आहे मारुतीसारखी
झाकल्या गेल्या मुठींच्या.


तरीही आदर्शांंच्या व्यक्तींची
कास आम्ही का धरावी.
आम्ही घडवू जीवन आमचे,
भविष्य रेखाहि खेचावी.

Thursday, October 29, 2015

मुंबई

मुंबईला मायानगरी म्हणतात ते उगाच नव्हे, याचा अनुभव मी गेले काही दिवस घेतेय. हि मायानगरी सगळ्यांची स्वप्नं पूर्ण करते असं म्हणतात. आणि खरच आहे, किती लोक स्वतःची सगळी स्वप्नं घेऊन मुंबईत येतात. पण हि मायानगरी कोणालाच दूर लोटत नाही. प्रत्येकाला स्वतःत सामाऊन घेते. त्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करायची संधी देते.
अशीच मी हि अनेकांपैकी एक. स्वतःच नशीब आजमवयला म्हणून मुंबईत आलेय. पु. ल. देशपांडे म्हणतात की मुंबईकर व्हायचं असेल तर फक्त घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालता आल पाहिजे. अन ते अगदी तंतोतंत बरोबर आहे. मुंबई ओळखलीच जाते ती तिच्या सतत धावत्या जीवनमानासाठी. अस म्हणतात की मुंबई कधीच झोपत नाही. मुंबईत पैसा सहज उभा करता येतो फक्त कसलही काम करायची तयारी असली पाहिजे. म्हणूनच की काय मुंबईला स्वप्नंनगरी असंही म्हणतात.
या मायानगरीत एक अदभुत शक्ति आहे, प्रत्येकाला स्वतःकडे आकर्षित करण्याची. आलेला प्रत्येक माणूस या गर्दीचा सहज एक भाग होऊन जातो. पहिल्यांदा गर्दीची वाटणारी भीती मग एक मजेचा हिस्सा होऊन जाते.
माणुसकी कुठे शिल्लक असेल तर ती मुंबईत. बॉम्बस्फोट असेल किंवा 26-11 सारखा दहशतवादी हल्ला, मुंबई तेवढ्यासाठीच स्थिर होते न पुढच्याच सेकेंडला परत आपला वेग पकड़ते. अशा कठिण प्रसंगी माणुसकिची मिसाल देत मुंबई परत पूर्ववत नव्या जोमाने उभी राहते.
मुंबई आणि समुद्र यांच तर एक विलक्षण नात आहे. दिवसभर थकून भागुन घरी येणा-या लोकाना काही विश्रांतीचे क्षण हा समुद्र किनारा देतो. आठवडी सुट्ट्यांना समुद्रकिना-यावर प्रचंड गर्दी असते. आणि समुद्र किना-यावर भेळ खाण्यात जी मजा आहे ती फाइव स्टार हॉटेल मधे नाही.
अशी हि मायानगरी आपल्यावर एवढी प्रेमाची बरसात करते पण आपण तिला काय देतो? हि मायानगरी वरच्या सगळ्या गोष्टींसाठी जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच ती कच-यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मुंबईला सर्वात मोठी समस्या कच-याचीच आहे. कच-याच व्यवस्थापनची जबाबदारी फक्त सरकार किंवा सफाई कामगारांची आहे का? आपल मुंबईच्या प्रति काहिच कर्तव्य नाही का? फार मोठ्या गोष्टी नाही पण प्लास्टिक पिशव्यांचा कमी वापर, आणि वापर केलाच तर रस्त्यावर टाकण्याऐवजी कचरापेटीत टाकणे अशा छोट्या छोट्या क्रुतीतुन आपण आपल्या परीने मुंबईला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पहिजे. यावर नक्की विचार करा. आणि आपल्या क्रूतीतून मुंबई स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करूया.

तरी ती दोन मने अबोला पाळायची

रोज आमची भेट व्हायची
नजरेला नजर थेट भिडायची
प्रेमाची तलवार काळजात घुसायची
तरी ती दोन मने अबोला पळायची

वर्गात रोज बाजुला बसायची
चोरून चोरून जरी पहायची
कधी कधी तर नजर मिळायची
पटकन सावरून नजर चुकवायची
तरी ती दोन मने अबोला पाळायची

प्रेम दोघांचे ऊतू जायचे
ओठांवर दोघांच्या आणि फुटायचे
मनात दोघांच्या खुप वाटायचे
तरी ती दोन मने अबोला पाळायची

त्या मनाचे ठसे वाटेत उमटायचे
एवढ असूनही ते दोघ एकच मानायचे
तरी ती दोन मने अबोला पाळायची

तो तिची वाट न ती त्याची वाट रोज बघायची
एकमेकांना पाहून खुष व्हायची
इतका एकमेकांना जीव लावायची
तरी ती दोन मने अबोला पाळायची

उजाडला की दिवस दोघे ठरवायची
आज बोलून टाकूच सगळ पक्क करायची
समोर येताच शब्दच विसरायची
तरी ती दोन मने अबोला पाळायची

हि तर कथा तुम्हा ऐकवायची
म्हणून हि तर कविता बनवायची
ती तुम्ही वाचून पहायची
आवडली तर कॉमेंट करायची
मनी आठवून वाचणारी रडायची
कारण हि कविता त्यांचीच असायची

Monday, October 19, 2015

शेवटी मी तुझीच रे

शेवटी मी तुझीच रे
शेवटी मी तुझीच रे

तुझ्यातच शोधलेल सुख 
तुझ्यासोबत वाटलेलं ते दुःख  
अन संशयाने केली मी ती चूक 
अजूनही मला सलतेय रे 
अजूनही मला सलतेय रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

तुझ्या मनात होत ते प्रेम 
माझ्या मनात का नाही 
तू सोडली नाही ती साथ 
अन मी सोडला तो हात 
अजूनही तुला शोधतोय रे 
अजूनही तुला शोधतोय रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

बोलायचं होत तुला खूप 
पण मला वेळ नव्हता 
आता मात्र मी मोकळी 
पण तू जवळ नव्हता 
अजूनही आतुर आहे रे 
अजूनही आतुर आहे रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

तुझ्यासोबत रमत जगले 
तेच खरे जीवन 
आठवताच अश्रू ढाळतात 
माझे हेच नयन 
अजूनही धारा वाहतात रे 
अजूनही धारा वाहतात रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

घडला मला तुझा तो सहवास 
फुलांचा दरवळला तसा तो सुवास 
अजूनही मी घेत आहे रे 
अजूनही मी घेत आहे रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

आता धसके खाऊ लागलाय 
तो माझा श्वास 
अन तुझ्या परतण्याचा तो प्रवास 
अजूनही आस तुझी धरतोय रे 
अजूनही आस तुझी धरतोय रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे