Thursday, September 17, 2015

कोकण..... काल आणि आज

 कोकण..... काल आणि आज

आजुबाजुला पसरलेले हिरवे डोंगर, ऐसपैस पसरलेल्या ठेंगण्याठुसक्या टेकड्या, नारळी-पोफळीच्या डोलणा-या रांगा, काजू आंब्याच्या फऴभारांनी बहरलेल्या बागा, उतरत्या छपराची कौलारू घरे, शेणाने सारवलेली, रांगोळ्यांनी भरलेली अंगणे, साधीभोऴी प्रेमळ माणसे. पांढऱ्याशुभ्र मऊशार वाळूचे लांबलचक किनारे, लाटांवर तरंगणाऱ्या शिडाच्या नावा.
        थोडक्यात सांगायचे तर,
           लाल लाल हि माती, इथले डोंगर हिरवे हिरवे.
           डोईवरती आकाशाने रंग पसरले बरवे.
           मासोळ्याचे सूर पाहण्या डोहामधून ज़ाऊया,
           चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊया.
असे हे कोकण. काश्मीर, केरळशी स्पर्धा करणारे माझे निसर्गरम्य कोकण.
        कोकण म्हटले की आपणाला आठवतो तो हिरवागार निसर्ग. सर्वाना भुरळ पाडणारा निसर्ग. गर्द वनराईना धुक्याच्या पांघरुणात लपेटून पहुडलेली आंबोली. तेथे कड्यातून पावसाळ्यात कोसळणा-या जलबिंदूंच्या माळा. आंबोलीसारख्या अनेक प्रेक्षणीय स्थळांनी नटलेले हे कोकण. गणपतीपुळे, हिरण्यकेशी सारखी तीर्थक्षेत्रे. मालवण, देवगड, वेंगुर्ला यासारखे समुद्र किनारे, सिंधुदुर्ग-विजयदुर्ग सारखे जलदुर्ग. रायगड, यशवंत, मनोहर गडासारखे किल्ले. पर्यटकांची गर्दी खेचणारी हि स्थळे. माझ्या कोकणचे हे खरेखुरे वैभव.
        कोकणातील लोककला हा तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय. कोकणातील जत्रांमधून रात्रीपासून पहाटेपर्यंत चालणारी दशावतारी नाटके हि तर कोकणची खास ओळख. उस्फुर्त संवाद, भरजरी वेशभूषा, लयबद्ध युद्धदृश्ये, हार्मोनियम-पखवाजाच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या मैदानात सादर होणारे दशावतारी नाटक आणि ते आतुरतेने पाहणारी कोकणी माणसे, हे कोकणात दिसणारे नेहमीचे दृश्य. कठपुतळ्या, मंगळागौरी, गणेशचतुर्थीसारख्या सणांना रंगणा-या फुगड्या, वाड्यापाड्यावर मंदिरातून रंगणारी भजने, पहाटेच्या प्रहरी दारावर येणारा पिंगळी. कोकणातील ह्या लोककलांनी कोकणात जे चैतन्य निर्माण केले आहे ते चैतन्य टिकवणे आज आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. कारण कोकणच्या शहरीकरणात आता ह्या लोककला एक तर नष्ट तरी होत आहेत किंवा आपले मुळरूप तरी बदलत आहेत. कठपुतळ्या आता फक्त प्रदर्शनीय झाल्या आहेत. दशावतारहि आता अधिक नाटकी आणि कृत्रिम होत चालले आहे. कोकणातील या लोककला आपल्याला जपायला हव्यात.
        कोकण रेल्वेने कोकणाचे सारे रूपच पालटून टाकले. घुंगुरमाळांचा मंजुळ आवाज करीत पहाटे पहाटे माल आणायला जाणा-या बैलगाड्या आता इतिहास जमा झाल्या आहेत. तरीसुद्धा डोंगरद-यांमधून वळणे घेत जाणारी कोकणकन्या आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. अरुंद सडकांची जागा आता चौपदरी रस्त्यांनी घेतली आहे. या रस्त्याने आता वाहनांची गर्दी आपणाला दिसते. शाळा कॉलेजच्य विद्यार्थ्यांपासून ते शेतात काम करणाऱ्या मजूरापर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसू लागले आहेत. ज्या कोकणी संस्कृतीचे आपण गोडवे गात असतो त्या संस्कृतीवरहि दूरदर्शनने आक्रमण केले आहे.
        ज्या कोकणात वि. सं. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, करंदीकर, पाडगावकर, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक यांच्यासारखे साहित्यिक जन्माला आले त्या कोकणात वाचनसंस्कृती टिकवण्यासाठीच नव्हे तर रुजवण्यासाठी प्रयत्न करायची आवश्यकता निर्माण झाली आहे.
        लोकमान्य टिळक, साने गुरुजी, मधु दंडवते, अप्पासाहेब पटवर्धन, बॅ. नाथ पै यांसारख्या थोर पुरुषांच्या या कोकणभूमीत त्यांच्याच विचारांची परवड होताना आज आपल्याला दिसत आहे. कोकणभूमीत रुजू पाहणारे हे राजकारण कोकणला कुठे घेऊन चालले आहे हे कळत नाही. कोकण विकसाच्या नावाखाली कोकणची हिरवाई तर नष्ट होणार नाही ना ? येऊ घातलेले औष्णिक ऊर्जा प्रकल्प आपल्या नारळ-पोफळी, काजू, आंब्याच्या राया तर नष्ट करणार नाहीत ना? या प्रश्नांनी कोकणी माणूस आज संभ्रमित आहे. ह्या सा-याविरुद्ध लढा देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. त्याला आपल्या निसर्ग देवतेचा बळी देऊन हा विकास नको आहे. त्याला उद्योगधंदे हवे आहेत पण आपले पर्यावरण संभाळून. फळांवर प्रक्रिया करणारे, मत्स्यउत्पादनातून निर्माण होणारे प्रकल्प त्याला हवे आहेत. पर्यटनावर आधारीत प्रदूषण विरहित उद्योग करण्यासाठी तो तयार होत आहे. यापूर्वी,"येवा, कोकण तुमचा आसा !" अस म्हणणारा कोकणी माणूस आता, "जावा, कोकण आमचा आसा !" असं खडसावून प्रदूषित उद्योगाविरूद्ध उभा राहतो आहे. आज कोणतेही स्थानिक वृत्तपत्र उघडले की यासंबंधीच्या बातम्या वाचायला मिळतात.
       डोंगरद-या, वृक्षराजी, समुद्रकिनारे, खळखळणा-या नद्या, मधुर फळांनी बहरलेल्या बागा, तुडुंब भरलेल्या विहीरी, ओथंबुन धावणारे आभाळातील काळे ढग, चमचमणा-या विजा, चंदेरी चांदण्यांची रात्र असा स्वर्गीय आनंद देणारे आमचे कालचें कोकण आजही आम्हाला हवे आहे. हे सर्व संभाळून भविष्यातील बदलणारे कोकण स्विकारायला आम्ही तयार आहोत.

No comments:

Post a Comment