Sunday, March 15, 2020

बाबा भाग - १

                                                         बाबा
         किती गोड शब्द आहे ना!. पण तुम्हाला माहितेय का आज जेवढी या शब्दाची किंमत कळतेय ना तेवढी ती या आधी कळली नव्हती.  मित्रांनो याच कारण पण तसाच आहे. काही दिवसांपुर्वी मी माझ्या वडिलांना गमावलं. ८ फेब्रुवारी २०२० साली त्यांचं निधन झालं.  ते फेसबुकवर पोस्ट येतात ना कि प्रत्येक यशस्वी मुलीचा मागे एक खूप विश्वास टाकणारा बाप असतो माझे पप्पा अगदी तसेच होते. मी आज IIT मध्ये M.Tech करतेय. ते नेहमी म्हणायचे कि मला फक्त तुझाकडून अपेक्षा आहे. माझं नाव तुच मोठं करशील असं मला वाटतं. आणि त्यांचा डोळ्यात तो आनंद दिसावा म्हणून मी पण खुप मेहनत घेतली.
          मी दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली आली तेव्हा त्यांना झालेला आनंद. मला IIT ला दाखला मिळाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा तो आनंद, त्यांना माझाबद्दलचा असलेला अभिमान त्यांचा प्रत्येक कृतीतून दिसत होता. काही दिवसांपूर्वी ते मला सोडायला आले होते IIT ला , खुप खुश होते. मला आज खूप बरं वाटतं कि जायच्या आधी मी त्यांची हि इच्छा पूर्ण करू शकली. आता माझं पुढचं यश ते पाहत असतील नसतील माहित नाही. पण जिवंतपणी मी त्यांना हा आनंद देऊ शकले ह्याच समाधान आहे.
          पण एक खंत पण आहे हे सगळं मिळवत असताना मला लवकर घरापासून लांब राहायला लागलं. मी अकरावी पासूनच हॉस्टेलवर राहते. त्यामुळे ह्या सगळ्यात त्यांचा सहवास कमी मिळाला. आता ते निवृत्त झाले होते घरी गेली कि आवडीने माशाची आमटी न भाजलेले मासे करायचे माझ्यासाठी म्हणून. न मग आम्ही दोघंच मिळून पूर्ण ताव मारायचो. तुमचा सहवासाचा लोभ होता पण नियतीचा डाव काही वेगळा होता असच म्हणायला हवं आता. सगळं खूप आठवेल पण तुमचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे.
           मला माफी मागायची आहे पप्पा तुमची कि तुम्ही रोज ओरडून पण मी तुम्हाला रोज कॉल नाही करू शकले. हि गोष्ट कायम खात राहील मला. आज मला तुमचा आवाज ऐकावासा वाटतो पण आता तो कधीच नाही ऐकता येणार. मला नेहमी तुमच्या सारखं बनायचं होत. तुमच्या आनंदातच मला सुख वाटायचं.
          मला माहित नाही हा मेसेज मी किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल पण जे लोक वाचतील त्यांना मला सांगायच आहे कि प्लीज जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या त्यांना खुश ठेवा. गमावल्या नंतर दुःख करून घेण्यात काहीच अर्थ नसतो आणि त्यांना आपल्याकडून अजून काहीच नको असत फक्त एक ५ मिनटं त्यांच्याशी प्रेमाने बोललं कि ते खुश होतात. प्लीज त्यांना वेळ द्या.
           आज खूप दिवसांनी मनातलं सगळं बोलून खूप बरं वाटलं तुम्ही ते वाचलंत न समजून घ्याल हि आशा.