Tuesday, August 4, 2015

माझी माय

या  ब्लॉगवर  एक  नवीन  गोष्ट  प्रकाशित करतेय . हि  माझ्या  आईची  गोष्ट आहे . तुमच्या  सगळ्यांशी  हि  गोष्ट  शेअर करताना  खूप  आनंद  होतोय.

माझी माय 

विधात्याने माझी आई स्मिता संजय रेडकर हिला १९६२ मध्ये मांगल्याची मूर्ती म्हणून या पृथ्वीवर जन्माला घातलं.माझ्या मामाच घर बांदा ह्या छोट्याश्या पण निसर्गाने नटलेल्या गावात आहे.घरात सहा भावंड.त्यातली ती शेंडेफळ. एकुलता एक भाऊ आणि पाच बहिणी. आई सांगते त्याप्रमाणे माझे आजोबा खुप उदारदिल होते.त्यांनी त्या काळी घरात सहा  मुले असतानाही एका गरीब मुलीला दत्तक घेतलं होत.माझी आई तिचा उल्लेख इंद्रा आक्का असा करते.वडिलोपार्जित जमीन फार होती.माझ्या सगळ्यात मोठ्या मावशीचा त्या काळी बालविवाह झाला.आई तशी लहानच असताना तिचे आई आणि वडिल दोघेही सहा सहा महिन्यांच्या फरकाने निधन पावले.त्यावेळी आईचे वय फारसे नव्हते,एवढे कि तिला त्यांचा चेहराही आठवत नाही.आई आणि मोठी मावशी यांत जवळपास २० वर्षांचा फ़रक.भावंडांच्या मनात एकमेकांबद्दल अफाट प्रेम आणि मामा तर फारच लाघवी.वयाच्या ८ ते १० वर्षांपर्यंत तिला आईवडिल नसल्याची जाणीवही नव्हती. वडिलांच्या निधनानंतर सगळी जबाबदारी मामावर आली. मामाने मुंबईला वेल्डिंगचा कोर्स केला होता.त्या शिक्षणाच्या जोरावर त्याने कंपनी सुरु केली.आई चौथित असताना शाळेत लागणारे रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आपआपल्या आईचे नाव लिहून आणण्यास सांगितले.त्यावेळी आईची चुलती त्यांचा अगदी आईप्रमाणे सांभाळ करी.अशी चुलती लाभायला पण भाग्य लागत.आणि आई तिचा उल्लेख 'आई' म्हणूनच करी.त्यामुळे साहजिकच आईने तिचे नाव लिहून नेले. बाईंच्या ते लक्षात आले कारण मधले नाव वेगळे होते.त्यावेळी सुमा मावशी आईच्या पुढच्याच वर्गात होती.तर बाईंनी तिला याबद्दल विचारले असता ती म्हणाली,"आम्हाला आईवडिल नाहीत,ती चुलतीच नाव सांगतेय". या एका वाक्याने तिच्या स्वभावात जो काही अमुलाग्र बदल झाला तो अजूनही तसाच आहे.त्यानंतर तिने काकीकडे किंवा भावंडांकडे कधीच कुठलाच हट्ट केला नाही.कुठलही काम करण्याची तयारी आणि कुठल्याही खडतर परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याची तिची तयारी असते. 
        आजपर्यंत आलेल्या कुठल्याही प्रसंगाला तिने नाव ठेवली नाहीत.अगदी धाडसाने तोंड दिले.पुढे मामाने आईला शिकवले. दहावी पर्यंतच शिक्षण जवळच्याच हायस्कूलमध्ये झालं.त्यानंतर बारावी झाली.माझ्या मामाने या सगळ्याचा खर्च एकट्याने झेपावला.बागायती केली.त्यानंतर मामाने तिला डि एड\ करायला देवगड(मिठबाव)ला पाठवल.कारण स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभं राहावं इतरांवर अवलंबून राहू नये या मताचा तो होता.तो स्वत: फार महत्वाकांक्षी,जिद्दी,कष्ट घेण्याची तयारी असणारा आणि प्रेमळ होता.डि एड\ झाल्यावर ४ वर्षे तिला नोकरी नव्हती.त्यामुळे येणारा ताण,लोकांची बोलणी सगळ तिने सहन केल.काजू फ़ैक्टरीत काम केल,मुलांचे क्लास्सेस घेतले.४ वर्षांनी नोकरी लागली कणकवली(कारंजे) येथे.त्यानंतर अजून एक घटना घडली, इंदिरा गांधींचा खून झाला आणि त्यावर्षी लागलेल्या सगळ्यांना ब्रेक देण्यात आला.हा ब्रेक ८ महिन्यांचा होता.त्याकाळात खुप ताण होता.पुन्हा नोकरी मिळेल कि नाही याच टेन्शन होत. पण नशिबाने साथ दिली आणि पुन्हा नोकरीचा कॉल आला.त्यानंतरच्या काळात संपूर्ण कुटुंबाला अजून एक मोठा धक्का बसला,तो म्हणजे मामाचे अपघातात झालेले अचानक निधन.मामाच्या निधनाने आई पार खचून गेली.फक्त आईच नाही तर सगळ कुटुंबच पूर्ण खचून गेल.मामाच निधन झाल त्यावेळी मामाची मुलगी फक्त ५ वर्षांची होती.पण मामीने आग्रह करून आईच्या लग्नाचा घाट घातला आणि माझ्या वडिलांशी म्हणजे संजय रेडकर यांच्याशी तिचा विवाह झाला.
        माझ इंजिनिअरिंग पूर्ण झाल आणि माझा भाऊ बी.एस्सी ला आहे.आईवडिलांनी स्वत:प्रमाणे आम्हालाही उच्च शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलय.आईचा शांत स्वभाव,चिडचिड नाही. कुठल्याही गोष्टीत आमची चूक झाली तरी शांतपणे समजून सांगते.तिने तिला जे जे नाही मिळाल ते सगळ आम्हाला द्यायचा प्रयत्न केलाय आणि पप्पांनीही तिला आदर्शवत साथ दिलीय. लहान असताना कित्येकदा मारलेही आहे,पण त्याचे महत्व आज कळते आहे.मी आणि माझा भाऊ आम्हा दोघांशीहि आई अगदी मैत्रिणीप्रमाणे वागते.
       माझ्या मैत्रिणी कित्येकदा मला विचारतात तुझी बेस्ट फ्रेंड कोण अस,यावर माझ एकच उत्तर असत,"माझी आई ". 

                                                                                                                                         शुक्रयाणी रेडकर 

                                                           


    

No comments:

Post a Comment