Saturday, January 16, 2016

माझा पहिला विमानप्रवास

लहान असताना आम्ही विमानाचा आवाज आला की धावत अंगणात यायचो आणि आकाशातून जाणाऱ्या त्या विमानाकडे बघून हात दाखवायचो आणि उड्या मारायचो. काय कुतुहल वाटायचे तेव्हा विमान बघून, आजही वाटतेच. अन् वाटायचं मी कधी प्रवास करणार विमानातून? पण हि माझी इच्छा एवढ्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं.
           खर तर आम्ही आमच्या कोकणातल्या गावी आलो होतो, डिसेंबर महिनातल्या देवीच्या जत्रौत्सवासाठी. त्या निमित्ताने सगळ्या नातेवाईकांची भेट होते आणि 4 दिवस निसर्गरम्य वातावरणात रहायला मिळणार हा आनंद वेगळाच. येताना तर आम्ही कोकणरेल्वेने आलो. पण परतीची टिकिट काढली नव्हती. तेव्हा काकांच्या मनात आलं आणि त्यानी आम्हा दोघांची विमानाची टिकिट काढली. पहिल्यांदा विमानप्रवास अनुभवायला मिळणार या कल्पनेने मी उडालेच. खर तर अजून दोन दिवस होते निघायला पण तिथे काय असणार, कस असणार या विचारत ते दोन दिवस कसे गेले कळलंच नाहि.
          शेवटी तो दिवस उजाडला 12 डिसेंबर 2015. संध्याकाळी आमचं 5:50 चं विमान होत. आम्ही दुपारी 11 च्या सुमारास गोव्याला जायला निघालो. कारण दुपारी आत्याकडे जेवायचा बेत होता. त्या आत्याचं घर वास्कोला आहे. त्यामुळे गोवन पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेता आला. जेवून 4:40 ला एअरपोर्टवर जायला निघालो. मी तर आता एक तासाने विमानात बसणार म्हणून हवेतच होते. वास्कोच्या एअरपोर्टवर पोहोचलो. तिथलं वातावरण अगदी वेगळ आणि माझ्यासाठी एकदम नवीन होत. गोआ पर्यटनसाठी प्रसिद्ध असल्याने तिथे विदेशी पर्यटकांची वर्दळ जास्त होती. सुरक्षाव्यवस्था अगदी जोखणण्यासारखी. हवाई सुंदरी म्हणजेच एअरहोस्टेस सगळीकडे वावरताना दिसत होत्या. जसजसा वेळ पुढे जात होता तसतसं मला अधिकच बैचेन वाटत होत. शेवटी आमच्या विमानाची सूचना झाली. विमानात प्रवेश करताच एअरहोस्टेसने हसून आमचं स्वागत केल. आणि नशीबाने मला विंडो सीट मिळाली. काहीच वेळात विमान रन वे वर होत. हळूहळू विमानाच वेग वाढला आणि विमानाने हवेत झेप घेतली. आणि असं वाटत होत की आम्ही हवेत तरंगतोय. गोव्याचा समुद्रकिनारा अगदी रम्य दिसत होता. घनदाट वनराई, मधुनच जाणारी एखादी अतिशय सुंदर द्रुश्य होत ते.
          संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला आलेला. आकाशात तांबुस रंगाच्या सोनेरी छटा पसरल्या होत्या. सूर्यदेव आकाशात विविध रंगाची उधळण करत आमचा निरोप घेत होते. आम्ही तो क्षण कॅमेराच्या मदतीने टिपयचा प्रयत्न केला. पण कॅमेरात ते दृश्य स्पष्ट दिसत नव्हतं. शेवटी डोळ्यांचा कॅमेरा करून ते दृश्य मी ह्रुदयाच्या मेमरी कार्ड मध्ये सुरक्षितरित्या जपून ठेवल.आता ढग दिसू लागले होते आणि ते खुप जवळच असल्यासारखे वाटत होते. प्रत्येकास लागणारी मदत करण्यास एअरहोस्टेस अगदी तत्पर होत्या. काळोख पडायला सुरुवात झाली होती. आता जमिनीवरचं काहीच दिसत नव्हत. पण मी मनोमन खुश होत होते कारण अशाच अंधारात मुंबई झगमगुन उठते, नाहि का ? मुंबई चं ते दृश्य बघायला मी आतुर होते. आणि त्यानंतर काही वेळातचं मुंबईने तीच दर्शन दिल. अगदी डोळ्यांचे पारणे फेडणार ते दृश्य होत. असंख्य दिवे आणि असंख्य दिव्यांचा तो झगमगाट, अवर्णनीय........!!!!! मुंबई म्हणजे मला आकाशगंगा वाटत होती. आणि त्यात दिसणारे ते असंख्य दिवे म्हणजे आकाशगंगेतले ते असंख्य तारे, असा भास होत होता. रस्त्यावरचे दिवे स्वतःची वेगळी ओळख दाखवत होते. पिवळसर तांबूस प्रकाशात न्हावून निघत होते. असे सगळे रस्ते एकमेकांना जोडलेले दिसत होते. आणि मुंबईचा नकाशा दाखवत होते. रस्त्यावरून जाणा-या गाड्या मुंगीएवढ्या दिसत होत्या. आणि अश्या मुंग्यांची लाईनचं लागली होती. ते दृश्य इतके विलोभनीय होते की न रहावून मी ते दृश्य कँमेरात टिपायचा प्रयत्न केला. पण त्या फोटोने काही माझे मन भरेना. आणि डोळ्यांत काय आणि किती साठवणार असा प्रश्न पडला. पण जमलं तेवढं सगळं नजरेत भरून घेतलं. आणि सान्ताक्रुझ विमान तळावर आमचं विमान उतरलं.
या अविस्मरणीय प्रवासाच्या सगळ्या आठवणी मी मनात साठवून ठेवल्या. आणि विमानातून उतरलो. माझा अनुभव तुमच्याशी शेअर करताना खुप मस्त वाटतयं.  तुमच्यापैकीही कित्येक जणांची विमानप्रवासाची इच्छा असेलच. पण खरच प्रत्येकाने अनुभवावा असाच तो प्रवास असतो. आयुष्यातील काही वेळ आणि पैसा मुद्दाम बाजुला ठेऊन एकदातरी विमानप्रवास नक्की अनुभवा. तुमच्या भावी विमानप्रवासासाठी माझ्या खुप खुप शुभेच्छा.आणि माझे काका विजय रेडकर यांना माझ्याकडून खुप खुप thank you. मला एवढे सुंदर क्षण अनुभवायची संधी दिल्याबद्दल.

No comments:

Post a Comment