Thursday, October 29, 2015

मुंबई

मुंबईला मायानगरी म्हणतात ते उगाच नव्हे, याचा अनुभव मी गेले काही दिवस घेतेय. हि मायानगरी सगळ्यांची स्वप्नं पूर्ण करते असं म्हणतात. आणि खरच आहे, किती लोक स्वतःची सगळी स्वप्नं घेऊन मुंबईत येतात. पण हि मायानगरी कोणालाच दूर लोटत नाही. प्रत्येकाला स्वतःत सामाऊन घेते. त्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करायची संधी देते.
अशीच मी हि अनेकांपैकी एक. स्वतःच नशीब आजमवयला म्हणून मुंबईत आलेय. पु. ल. देशपांडे म्हणतात की मुंबईकर व्हायचं असेल तर फक्त घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालता आल पाहिजे. अन ते अगदी तंतोतंत बरोबर आहे. मुंबई ओळखलीच जाते ती तिच्या सतत धावत्या जीवनमानासाठी. अस म्हणतात की मुंबई कधीच झोपत नाही. मुंबईत पैसा सहज उभा करता येतो फक्त कसलही काम करायची तयारी असली पाहिजे. म्हणूनच की काय मुंबईला स्वप्नंनगरी असंही म्हणतात.
या मायानगरीत एक अदभुत शक्ति आहे, प्रत्येकाला स्वतःकडे आकर्षित करण्याची. आलेला प्रत्येक माणूस या गर्दीचा सहज एक भाग होऊन जातो. पहिल्यांदा गर्दीची वाटणारी भीती मग एक मजेचा हिस्सा होऊन जाते.
माणुसकी कुठे शिल्लक असेल तर ती मुंबईत. बॉम्बस्फोट असेल किंवा 26-11 सारखा दहशतवादी हल्ला, मुंबई तेवढ्यासाठीच स्थिर होते न पुढच्याच सेकेंडला परत आपला वेग पकड़ते. अशा कठिण प्रसंगी माणुसकिची मिसाल देत मुंबई परत पूर्ववत नव्या जोमाने उभी राहते.
मुंबई आणि समुद्र यांच तर एक विलक्षण नात आहे. दिवसभर थकून भागुन घरी येणा-या लोकाना काही विश्रांतीचे क्षण हा समुद्र किनारा देतो. आठवडी सुट्ट्यांना समुद्रकिना-यावर प्रचंड गर्दी असते. आणि समुद्र किना-यावर भेळ खाण्यात जी मजा आहे ती फाइव स्टार हॉटेल मधे नाही.
अशी हि मायानगरी आपल्यावर एवढी प्रेमाची बरसात करते पण आपण तिला काय देतो? हि मायानगरी वरच्या सगळ्या गोष्टींसाठी जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच ती कच-यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मुंबईला सर्वात मोठी समस्या कच-याचीच आहे. कच-याच व्यवस्थापनची जबाबदारी फक्त सरकार किंवा सफाई कामगारांची आहे का? आपल मुंबईच्या प्रति काहिच कर्तव्य नाही का? फार मोठ्या गोष्टी नाही पण प्लास्टिक पिशव्यांचा कमी वापर, आणि वापर केलाच तर रस्त्यावर टाकण्याऐवजी कचरापेटीत टाकणे अशा छोट्या छोट्या क्रुतीतुन आपण आपल्या परीने मुंबईला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पहिजे. यावर नक्की विचार करा. आणि आपल्या क्रूतीतून मुंबई स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करूया.

No comments:

Post a Comment